
यवतमाळ : प्रतिनिधी
एका जन्मदात्या आईनं आपल्या दोन चिमूकल्यांना विषारी औषध पाजून स्वत:चंही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. या धक्कादायक घटनेत आईसह दोन मुलांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
रेश्मा नितीन मुडे असं या घटनेत मृत पावलेल्या आईचं नाव असून तिची मुले श्रावणी (वय ६) आणि सार्थक (वय ३) या दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे ही घटना घडली. सोमवारी सायंकाळी रेश्मा हिनं आपल्या दोन मुलांना विषारी औषध पाजलं आणि त्यानंतर स्वत:ही हे औषध प्राशन केलं. त्यानंतर तिघांनाही त्रास व्हायला लागल्यानंतर ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली.
कुटुंबीयांनी तिघांनाही तात्काळ सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान आई रेश्मा आणि मुलगा सार्थक यांचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात श्रावणीला पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचीही प्राणज्योत मावळली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून रेश्मा मुडे हिनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत कोणतंही कारण समोर आलेलं नाही.