Site icon Aapli Baramati News

Breaking News : शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपये आणि मृतांच्या कुटुंबियांना भरीव मदत करा : विरोधी पक्षनेते अजित पवार

ह्याचा प्रसार करा

गडचिरोली : प्रतिनिधी  

एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे.

अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा, भामरागड आणि अहेरी भागातील गावांची पाहणी आज अजित पवार यांनी केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अतिवृष्टीत जे नुकसान झाले आहे त्याची सगळी माहिती यावेळी घेतल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करताना ज्या घरांना ओलावा आला आहे त्यांचाही समावेश करावा अशी विनंती अजित पवार यांनी सरकारला केली आहे.

साधारण या भागात दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे त्यामध्ये गडचिरोलीमध्ये २५ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. धान आणि पिकांवर शेतकऱ्यांचा संसार अवलंबून होता त्यासाठी त्याला वर्षभर जगण्याकरीता संघर्ष करावा लागणार आहे त्यामुळे साधारण पाऊणलाख हेक्टरी ज्यांचं पीक उध्वस्त झालं त्यांना तातडीने सरकारने मदत दिली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

गडचिरोली जिल्हयात अतिवृष्टीमुळे दहा दिवस सुट्टी जाहीर झाली होती म्हणजे एवढे दिवस मोलमजुरी करणार्‍या लोकांना काहीच मिळणार नसेल तर त्यांनी जगायचं कसं हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे असेही अजित पवार म्हणाले. त्यामुळे याचा साकल्याने विचार सरकारने केलाच पाहिजे आणि भरीव अशी मदत मग ती केंद्र सरकारकडून आणा किंवा राज्याकडून द्या परंतु त्यांना मदत करा असेही सरकारला खडसावून सांगितले आहे.

जिल्ह्यातील १२ तालुक्यापैकी अहेरी, सिरोंचा, भामरागड या भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी पंचनामे करायला सांगून दहा ते बारा दिवस झाले तरी सगळीकडील पंचनामे झालेले नाहीत. ज्या गावांना भेटी दिल्या त्या शेतकऱ्यांनी पंचनामे झाले नाहीत असे सांगितले आहे. आधारकार्ड व अर्ज फक्त घेतला आहे. परंतु पंचनामे केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत कशी देणार आहात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अजित पवार यांनी विचारणा केली.

१२ तालुक्यातील आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे जातील त्यानंतर ते विभागीय आयुक्त ( नागपूर ) तिथून मदत व पुनर्वसन विभाग मुंबईला आणि मग तिथे फायनल होऊन त्यानंतर शेतकऱ्यांना मदत होणार आहे. आज शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची तातडीची गरज आहे. तातडीने अधिवेशन घेण्याचीही गरज आहे. पावसाळी अधिवेशन व्हायला विलंब होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. याकडे सगळा महाराष्ट्र बघतोय… कालपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व यामध्ये विलंब लावू नका असे सांगितले आहे. आम्ही दोघं बघतोय ना असे बोलले परंतु दोघांनी मुंबईतून बघणं आणि ३७ जिल्ह्यात मंत्री नेमून पालकमंत्री पद देणं, त्यांना तिथे बसून या यंत्रणांना कामाला लावायला लागणं यामध्ये खूप फरक पडतो असेही अजित पवार यांनी सुनावले आहे.

नैसर्गिक संकट आल्यावर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे खासदार, आमदार या सर्वांना एकत्र घेऊन काम केलं तर त्याचे रिझल्ट हे गतीने मिळायला सुरुवात होते. परंतु तसं दुर्दैवाने आज पहायला मिळत नाहीय. शेतकरी तर खूप हवालदिल झाला आहे. त्यांना वीजेचे कनेक्शन मिळत नाहीय. पीक वाया गेले तर त्यावर पीक कर्ज घेऊ शकत नाही. त्याला पुन्हा बी किंवा रोपं दिली तरी ती रोपं सध्या सडली आहेत कुजली आहेत. असं अतोनात नुकसान झालं आहे असेही अजित पवार म्हणाले.

या भागाचे आमदार बाबाराव आत्राम आणि आमदार रोहित पवार हे व्हाया तेलंगणातून जावून या नुकसानीची पाहणी करून आले आहेत. एसटी बंद होती ती पुन्हा सुरु करा असेही प्रशासनाला सांगितले आहे. सिरोंचा ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्वरीत दुरुस्त करण्याची गरज आहे. याबाबत विचारणा केली असता अधिकार्‍यांनी साडेपाच मीटरला परवानगी दिली आणि नॅशनल हायवे बोलते की, साडेसात मीटरला परवानगी दिल्याशिवाय आम्ही खड्डे बुजवू शकत नाही किंवा काम करु शकत नाही म्हणजे साडेपाच आणि साडेसात या गोंधळामध्ये लोकांचा, जनतेचा काय दोष आहे. त्यांनी काय पाप केलंय असा रोखठोक सवालही अजित पवार यांनी सरकारला केला आहे. दरम्यान, हा विषय नितीन गडकरी यांच्या कानावर घालून स्वतः लक्ष द्या म्हणून फोन करणार आहे. वनविभागाने नाहरकत देण्याची गरज आहे त्यांनीही परवानगी दिली नसल्याने हा रस्ता रखडला आहे याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version