Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल; महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा..!

ह्याचा प्रसार करा

अमरावती : प्रतिनिधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीतील राजापेठ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भिडे यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर पडसाद उमटत असून भिडे यांना तातडीने अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधी हे मुस्लिम समाजाचे होते असा दावाच त्यांनी केला आहे. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्यावेळी त्यांनी मोठ्या रक्कमेची चोरी करून पोबारा केला होता. त्यामुळे संबंधित जमीनदाराने त्यांच्या पत्नीला आपल्याकडे आणून ठेवले. त्यानंतर महात्मा गांधींचा जन्म झाला असं खळबळजनक विधान त्यांनी केलं.

भिडे यांच्या विधानानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच काल या विषयावरून विधीमंडळातही गदारोळ झाला. भिडे यांच्यावर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी विरोधकांच्या वतीने करण्यात आली. दुसरीकडे राज्यभरात आजही आंदोलने सुरूच आहेत. अशातच भिडे यांच्या विरोधात अमरावतीच्या राजपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कृती यांनी राजपेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संभाजी भिडे आणि कार्यक्रमाचे आयोजक निशांत जोध यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version