Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : एसटी बस चालकाचं प्रसंगावधान अन् वाचला ३७ प्रवाशांचा जीव; ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येताच ‘अशी’ थांबवली बस..!

ह्याचा प्रसार करा

बुलढाणा : प्रतिनिधी  

मागील आठवड्यात सप्तश्रुंगी गडाकडे जाणाऱ्या एसटी बसचे ब्रेक फेल होऊन बस ३०० फुट खोल दरीत पडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती टळली. एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याचं लक्षात घेताच चालक व वाहकानं अतिशय धाडसाने बस थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळून तब्बल ३७ प्रवाशांचे जीव वाचले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर हद्दीत ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की,  आज सकाळी एक बस खामगाववरून सप्तश्रुंगी गडाकडे जात होती. या बसमधून तब्बल ३७ प्रवाशी प्रवास करत होते. ही बस मलकापूर येथे आली. त्यावेळी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. ही बाब चालक अमोल केणेकर व वाहक कमल वाघ यांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी चालत्या बसमधून बाहेर उडी मारली.

त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेला मोठा दगड आणून तो बसच्या चाकाखाली टाकला. त्यामुळे ब्रेक निकामी झालेली ही बस जागेवर थांबली. त्यानंतर तात्काळ बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर चालक अमोल केणेकर यांनी आगार व्यवस्थापकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करून नादुरुस्त बस आगाराकडे नेण्यात आली.

दरम्यान, चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे या बसमधील तब्बल ३७ प्रवाशांचा जीव वाचला. स्वत: जीवावर उदार होवून बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे या चालक-वाहकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version