मुंबई : प्रतिनिधी
देशातील कोरोना निर्मूलनाच्या लढ्याला महाराष्ट्राच्या चुकीमुळे फटका बसला असे वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. त्यावर आता राज्यातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांनी आपल्या व्यक्तव्याबद्दल राज्याची माफी मागावी अशी मागणी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. महाराष्ट्रालाही कोरोनाच्या संकटाने घेरले आहे. या परिस्थितीत वारंवार केंद्र शासनाकडे आर्थिक मदतीसह लस पुरवठ्याची मागणी केली गेली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून केंद्रीय आरोग्यमंत्री महाराष्ट्रालाच दोष देतात. याचा आम्ही निषेध करीत असल्याचे सांगून नाना पटोले म्हणाले, डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्या बद्दल आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.
कोरोनाचे संकट दूर करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असतानाही केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असा घणाघातही नाना पटोले यांनी केला. सद्यस्थितीत भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.