मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या प्रयत्नात असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा हे सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहेत. शुक्रवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र ती आज होईल असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, राणा दांपत्याबाबत मुंबई पोलिसांनी खळबळजनक दावा केला आहे.
आम्हाला केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण करायचं होतं, असं म्हणत राणा दांपत्यानं जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वालाच आव्हान देण्याचा मोठा डाव त्यामागे होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.
सत्तेपासून वंचित असलेला भाजप आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विरोधक हे जाणीवपूर्वक सरकारविरोधी वातावरण तयार करून आघाडी सरकार उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात होते, असेही पोलिसांनी या दाव्यात म्हटले आहे.
राणा दांपत्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे घोषित करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत राज्य सरकारच्या यंत्रणेलाच आव्हान दिले होते असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे.