Site icon Aapli Baramati News

वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी चिंचवड मनपाला हस्तांतराबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे अजितदादांचे आदेश

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी 

प्रतिदिन तीस दशलक्ष लीटर क्षमतेची वाघोली पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस हस्तांतरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक झाली. वाघोली पाणीपुरवठा योजनेचा लाभ पिंपरी-चिंचवड शहराला मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही गतीने करावी, असे सांगून या कामी लोकप्रतिनिधी व महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केल्या.

बैठकीला आमदार महेश लांडगे, आमदार सुनील टिंगरे, आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.

यावेळी वाघोली पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत तसेच रावेत बंधाऱ्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. रावेत बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी या बंधाऱ्याची उंची वाढवण्याबाबत अथवा नवीन बांधकामाबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version