Site icon Aapli Baramati News

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणे हेच अभिवादन ठरेल : अजित पवार

ह्याचा प्रसार करा

मुंबई :  प्रतिनिधी

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता. देशप्रेमाने भारावलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे संरक्षण, अर्थ, गृह, परराष्ट्र मंत्री, उपपंतप्रधान पद त्यांनी भूषविले. या संपूर्ण कारकिर्दीत जनतेशी नाळ त्यांनी कायम जोडली होती.

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव होता.  सामाजिक कार्य आणि साधी राहाणी, वाचनाची आवड हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्वगुण व धडाडी ओळखून त्यांना पुढे आणले. कृषी, शिक्षण, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांची जाण असलेले त्यांचे नेतृत्व होते. देशाचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी दिलेले योगदान देश कायम स्मरणात ठेवेल. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version