आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

‘त्या’ चिमूकलीला अजितदादांना भेटून फक्त अभिनंदन म्हणायचं होतं; व्यस्त कार्यक्रमातही ती भेटली आणि शेजारी बसून अजितदादांशी गप्पाही मारल्या..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल सर्वच स्तरात प्रचंड क्रेझ आहे. त्यात लहान मुलेही मागे नाहीत हे अनेकदा पाहायला मिळतं.. बारामतीत एका चिमूकलीला अजितदादांना भेटायची इच्छा होती.. शनिवारी प्रचंड व्यस्त दौऱ्यातही तिची अजितदादांना भेटण्याची इच्छा तर पूर्ण झालीच.. मात्र काही काळ दादांशेजारी बसून त्यांच्या कामाची स्टाईलही अनुभवायला मिळाली.. अजितदादांच्या संवेदनशील स्वभावाची प्रचितीही या निमित्तानं उपस्थितांनी अनुभवली..

काल शनिवारी दि. २३ सप्टेंबर रोजी अजितदादांनी बारामतीत जवळपास तेरा कार्यक्रमांना हजेरी लावली. बारामती दूध संघातील वार्षिक सभेदरम्यान अमोल तावरे हा कसबा येथे वास्तव्यास असलेला युवक आपल्या तीन वर्षांच्या सानवी या चिमूकलीला घेऊन आला होता. त्यावेळी त्यानं आपल्या मुलीला अजितदादांना भेटायचं असल्याचं स्थानिक पत्रकारांना सांगितलं. त्यावर या पत्रकारांनी अजितदादांच्या अंगरक्षक व स्वीय सहाय्यकांना याची माहिती दिली.

सभेदरम्यान सानवीला अजितदादांना भेटण्याची संधी मिळाली.. तिनं एक गुलाबाचं फूल अजितदादांना दिलं.. अजितदादांनीही कौतुकानं तिच्याकडे पाहत फूल घेतलं.. तिची विचारपूसही केली.. एवढ्यावरच न थांबता तिला स्वत:च्या शेजारी बसवून तिच्याही गप्पाही मारल्या. चिमूरड्या सानवीसाठी हे सगळं अनपेक्षित होतं.. मागील काही दिवसांपूर्वी आजारी असतानाही तिनं अजितदादांना भेटायचा तगादा कुटुंबियांकडे लावला होता; मात्र प्रत्यक्ष भेटीनंतर तिचा आनंद गगनातही न मावणारा होता असं तिचे वडील अमोल तावरे यांनी सांगितलं..

हा संपूर्ण प्रसंग व्यासपीठावरील मान्यवरांसह उपस्थित दूध उत्पादक सभासदही पाहत होते.. प्रचंड शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांच्या स्वभावाची दुसरी बाजू या निमित्तानं उपस्थितांनी अनुभवली. चिमुकल्या सानवीनं अजितदादांच्या भेटीसाठी आग्रह धरला. पण तिचा हा आग्रह केवळ छोटीशी भेट न राहता आयुष्यभरातील मोठी आठवण ठरली असंच या निमित्तानं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us