
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तब्बल ७ हजार ८०० जण बोगस प्रमाणपत्र घेऊन सेवेत रुजू झाले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस या बोगस शिक्षकांचा शोध घेत आहेत. अशातच जे प्रमाणपत्र सादर करणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा पवित्रा घेण्यात आला आहे.
१३ फेब्रुवारी २०१३ नंतर प्राथमिक आणि आठवीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. राज्यात टीईटी परिषदेकडे आतापर्यंत ६ हजार प्रमाणपत्र जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर जे प्रमाणपत्र जमा करणार नाही त्यांच्या विरोधात कारवाईचे शस्त्र हाती घेतले आहे. प्रमाणपत्र जमा न करणाऱ्या शिक्षकांचा पगार थांबवण्याचा निर्णय या परिषदेने घेतला आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र देऊन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची कोंडी होऊ लागली आहे.
प्रमाणपत्राच्या अटीमुळे बोगस शिक्षकांचा पर्दाफाश होणार आहे. कारवाईच्या भीतीमुळे जे प्रमाणपत्र जमा करणार नाही, त्याचा पगार थांबवला जाणार आहे. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ज्यांनी प्रमाणपत्र जमा केले आहे त्यांची परिषदेमार्फत तपासणी होणार आहे. तपासणीदरम्यान दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.