पुणे : प्रतिनिधी
टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ च्या परीक्षेत तब्बल ७ हजार ८८० परीक्षार्थींना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तपासात समोर आले आहे. ही संख्या मोठी असल्याने दोषानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.याबाबत राज्य सरकारला परीक्षार्थींच्या पत्त्यासह यादी देणार आहोत, अशी माहिती, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ ची परीक्षा २०२० मध्ये पार पडली. या परीक्षेत एकूण १६ हजार परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ७ हजार ८८० परीक्षार्थी बनावटरित्या उत्तीर्ण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अंतिम यादीची फेरतपासणी केली असता, जातीचा रकाना बदलून उत्तीर्ण होणे, परीक्षार्थींच्या ओएमआर शीटमध्ये बदल, ओएमआर सीट स्कॅन केल्यानंतर निकालात बदल अशाप्रकारे घोटाळे केले आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष देणे आवश्यक आहे. मात्र हे प्रमाणपत्र पोस्ट आणि कुरियने पाठवले गेले आहेत. याबाबत पोलिसांनी जिल्ह्यांकडून सविस्तर माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या चार ते पाच जिल्ह्यातील माहितीनुसार पोस्टाने पाठवलेल्या प्रमाणपत्रपैकी ३०० प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. या सगळ्या माहितीची तपासणी करून राज्य सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे.