Site icon Aapli Baramati News

TET Breaking : टीईटी परीक्षेमध्ये ७८०० उमेदवारांना पैसै घेऊन उत्तीर्ण केल्याचं उघड

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

काही दिवसांपासून गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटीप्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. २०१९-२०२० मध्ये परीक्षामध्ये अपात्र झालेल्या सुमारे ७ हजार ८०० उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना सायबर पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्षात जाहीर केलेला निकालाची तपासणी केली होती. २०१९-२० मध्ये झालेल्या परीक्षेत तब्बल १६ हजार ५९२ उमेदवारांना उत्तीर्ण केले होते. मात्र दोन्ही निकाल तपासून पाहिल्यानंतर ७८०० उमेदवार हे अपात्र असून त्यांना पात्र केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.

२०१९-२० मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पहिल्या पेपरला सुमारे १ लाख ८८ हजार ६८८ उमेदवारांनी परीक्षा दिली असून त्यातील १० हजार ४७८ उमेदवार पात्र केले होते. तर दुसर्‍या पेपरला १ लाख ५४ हजार ५९६ उमेदवारांनी परीक्षा दिली असून त्यातील ६ हजार १०५ उमेदवार पात्र ठरवले होते. १९ जानेवारी २०२० रोजी हा निकाल घोषित केला होता. 

त्याचबरोबर, २०१८ मध्ये घेतलेल्या याच परीक्षेत ९ हजार ६७७ उमेदवारांना पात्र करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, अपात्र ठरलेल्या ५०० उमेदवारांकडून प्रत्येकी पन्नास ते साठ हजार रुपये घेऊन त्यांना पात्र केले होते. सायबर पोलिसांकडून सध्या या परीक्षेचा निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केल्यावर निकालाची तपासणी सुरू असून या निकालातील आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करत असताना टीईटी परीक्षेमध्येदेखील गैव्यवहार  झाल्याचे समोर आले होते. सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षेमध्ये पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिषदचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर, राज्य शिक्षक परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, जीए सॉफ्टवेअरचा अश्विन कुमार यांच्यासह  इतरांना पोलिसांनी अटक केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version