पुणे : प्रतिनिधी
पुणे विद्यापीठात बसविण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अगदी काही दिवसांवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याने हे काम अगदी जलद गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार समीर भुजबळ यांनी विद्यापीठाला भेट देऊन या कामाचा आढावा घेतला.
येत्या ३ जानेवारी रोजी पुणे विद्यापीठाच्या मुख्य परिसरात मुख्य इमारतीत सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठात पुतळा बसवत असतानाच भिडे वाड्यात मुलींची शाळा उभी केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने ही शाळा उभी करण्यात येणार आहे.
समीर भुजबळ यांनी कात्रज येथील परदेशी स्टुडिओ येथे भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासोबत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चादेखील केली.
यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्राचार्य संजय चाकणे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे, वैष्णवी सातव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, उपाध्यक्ष हर्षद खैरणार, प्रदीप हुमे, शिवराम जांभूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.