Site icon Aapli Baramati News

आजपासून दहावीची परीक्षा सुरू; १६ लाख ३९ हजार विद्यार्थी देतायत परीक्षा

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात मंगळवारपासून दहावी बोर्डाची लेखी परीक्षा सुरू होत आहे.  गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर या परीक्षा होत आहेत. त्यामध्ये राज्यात २१ हजार ३८४ परीक्षा केंद्रांवर १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. कोरोनाच्या संकट काळात लिखाणाची सवय कमी झाल्याने यावेळी विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता, मानसिक दडपण न घेता विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि ७ लाख ४९ हजार ४७८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात ५ हजार ५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून तब्बल २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा होणार आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज विलंब शुल्क न घेता स्वीकारण्यात आले.

दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका देताना एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकिट याप्रमाणे पाकिटे देण्यात येतील. हे पाकिट पर्यवेक्षक आपल्या परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन व त्यानंतर स्वत:ची स्वाक्षरी करून उघडतील. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यास आणखी मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. तसेच मुख्य परीक्षेनंतर पुरवणी परीक्षा साधारणपणे जुलै-ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात येईल, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version