पुणे : प्रतिनिधी
राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा पुढील महिन्यात होणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे प्रवेशपत्र आजपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. मिळणार आहे. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर हे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या प्रवेशपत्राची मुद्रित प्रत शाळा मुख्याध्यापक -प्राचार्यांची स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावे. त्यासाठी वेगळे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारू नये. प्रवेशपत्रात बदल असल्यास शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन ते बदल करून घ्यायचे आहेत.
प्रवेशपत्र हरवल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची दुसरी प्रत तयार करून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून द्यावे. छायाचित्रात दोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांची छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापक- प्राचार्यांची शिक्का मारून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान घेण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षा देता आल्या नाही, तर त्यांना ५ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान परीक्षा देता येतील. परंतु बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील.