बारामती : विशेष प्रतिनिधी
अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मिडियासह परिसरात ‘हवा’ करण्याचं फॅड वाढत आहे. त्यातूनच अनेकदा गंभीर घटना घडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आता अल्पवयीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेने ‘अल्पवयीन’ या गोंडस नावाखाली बोटचेपी भूमिका न घेता खाकीचा धाक दाखवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
बारामतीत गुरुवारी शशिकांत कारंडे यांचा निर्घृण खून करण्यात आला. यातील तिघेही आरोपी अल्पवयीन असून केवळ परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलल्याची कबुली त्यांनी दिली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीची प्रचिती आली आहे. ही गुन्हेगारी वेळीच न रोखल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘सोशल मिडिया’ घातक ठरतोय का..?
अलीकडील काळात सोशल मिडियाचा वापर वाढला आहे. त्यातूनच अल्पवयीन मुलांमध्ये नवनवीन गोष्टींचे फॅड वाढल्याचे पाहायला मिळते. सोशल मिडियावर अपवाद वगळता फारशी बंधने नाहीत. त्यामुळे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या अनेक बाबी इथे सहज उपलब्ध होतात. त्यातूनच आपणही ‘हवा’ केली पाहिजे अशी मानसिकता तयार व्हायला वेळ लागत नाही, ही बाबही या निमित्ताने पुढे आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी वाढण्यासाठी सोशल मिडियाही कारण ठरत आहे.
रस्त्यापासून ‘गुन्हेगारी’ रोखण्याची गरज
आजकाल शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांना वाहन परवाना मिळण्याआधीच हवी ती वाहने दिली जातात. दररोज हजारो अल्पवयीन मुले वाहन परवाना नसतानाही रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे आपल्याला काहीही होत नाही ही भावना वाढीस लागते. परंतु इथेच जर कारवाईचा बडगा उगारला गेला, तर भविष्यातही ही मुले कायद्याच्या कक्षेत चालतील. अन्यथा रस्त्यापासून सुरू झालेली ही गुन्हेगारी कधी एखाद्याच्या जीवापर्यंत पोहोचेल हे सांगता येत नाही.
फांद्या न तोडता मूळावर घाव गरजेचा..!
अनेक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग हा कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा पाठबळामुळे झालेला असतो. अशावेळी संबंधित अल्पवयीन मुले शिक्षा भोगतात. कर्ता-करविता नामानिराळा राहतो. अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यामुळे अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी फांद्या न तोडता त्यांच्या मूळावर अर्थातच बलस्थानावर घाव घालणे तितकेच गरजेचे आहे.
पालकांचीही ‘जबाबदारी’ तितकीच..!
अनेक अल्पवयीन मुले आपल्या पाठीमागे काय करतात याची यत्किंचितही खबर पालकांना नसते. अशी अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. त्यामुळे या मुलांमधील गुन्हेगारी वाढण्यासाठी यंत्रणेसह पालकही तितकेच जबाबदार आहेत. आपला मुलगा शाळा-महाविद्यालयात जाऊन काय करतो, सोशल मिडीयात त्याचं काय सुरू आहे, त्याच्या सभोवताली असलेले वातावरण या अनेक गोष्टींबद्दल पालक अनभिज्ञ असतात. आपल्या मुलाकडून एखादे मोठे कृत्य घडल्यानंतर त्यांचे डोळे उघडले जातात. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी पालकांनीही तितकेच सतर्क राहून आपल्या मुलांवर योग्यवेळी नियंत्रण आणणे महत्वाचे ठरेल.
‘अल्पवयीन’ नावाखाली बोटचेपी भूमिका नको
अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे. शाळा-महाविद्यालयात शिकणारी मुले मागचा-पुढचा विचार न करता बेधडकपणे गुन्ह्यात सहभागी होतात. त्याचवेळी त्यांच्यात अल्पवयीन असणं आणि कायद्यातून मिळणारी सूट या बाबी प्रकर्षणाने बिंबवल्या जातात हे सत्य नाकारून चालणार नाही. त्याचवेळी पोलिस यंत्रणेकडूनही अशा आरोपींकडे अल्पवयीन या नजरेतून पाहिले जाते. त्यातून त्यांच्यावर जो धाक निर्माण व्हायला हवा तो होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी बोटचेपी भूमिका न घेता खाकीचा दबदबा या अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
सध्याच्या काळात सोशल मिडीयाचा गैरवापर सर्रास होताना दिसतो. त्यामध्ये वेगवेगळी शस्त्रे घेऊन फोटो टाकणे, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ प्रसारीत करणे या बाबी नित्याच्या बनल्या आहेत. मात्र त्यावर पोलिस यंत्रणेकडून कारवाई होत नाही. कारवाईच होत नसल्यामुळे या वर्गात खाकीचा धाक राहत नाही. अनेकजण कमी वयातच गुन्हेगारी क्षेत्रात खेचले गेलेत. त्यासाठी वाट्टेल तो मार्ग अवलंबला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आताच पोलिस यंत्रणेने याला ‘लगाम’ लावण्याची गरज आहे. अन्यथा हीच अल्पवयीन मुले भविष्यात ‘सराईत गुन्हेगार’ म्हणून पोलिस यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरतील, हे मात्र तितकंच खरं..!