
मुंबई : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेने पाच राज्यांपैकी उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्याची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र तिन्ही राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेला त्यांची लायकी कळली असेल, अशी घणाघाती टीका केली आहे.
नितेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून शिवसेनेने महाराष्ट्रात १८ खासदार आणि ५६ आमदार निवडून आणले. जर मोदी यांचा फोटो काढला तर सेनेची काय लायकी आहे हे पाच राज्यांच्या निकालावरून दिसते.
जर शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला त्यांची ताकद आजमावयची असेल, तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे. राजीनामे देवून पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे. तेव्हा तुम्हाला कळेल की उत्तरप्रदेश आणि गोव्यापेक्षाही बिकट परिस्थिती तुमची महाराष्ट्रात होईल, असा टोला नितेश राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लगावला.