
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्हा सहकारी बँकेतील निवडणुकीवरून आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. मी शिफारस न केल्यामुळेच शिवेंद्रराजे बँकेचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, अशी बोचरी टीका शशिकांत शिंदे यांनी केली होती. त्यावर बोलताना शशिकांत शिंदे यांना थंड करून घरी पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशाराच शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव चर्चेत होते. त्या अनुषंगाने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. मात्र ऐनवेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची वर्णी लागली. त्यावरून आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष झाले नाहीत, अशी बोचरी टीका केली होती.
सहानुभूती मिळवण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी हे व्यक्तव्य केले आहे. राजकारणामुळे आणि गटबाजीमुळे त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे आता त्यांनी आपले लोक आपल्यासोबत आहेत का याबद्दल आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगून शिवेंद्रराजे म्हणाले, त्यांनी स्वत:च्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नये. त्यांना जितके वातावरण तपावयाचे आहे, त्यांनी तापावावे. आम्ही त्यांना थंड करण्यास तयार आहोत. त्यांना थंड करून परत घरी पोहचवण्याची ताकद आमच्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बँकेचे अध्यक्ष पद मिळावे हा माझा मुळीच अट्टाहास नव्हता. मला पाच वर्ष बँकेचा अध्यक्ष बनवण्याची हरकत घेतली होती हे तुम्ही विसरलात का ? असा प्रश्न उपस्थित करत मागच्या पाच वर्षांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी आपल्या नावाची शिफारस केली नसल्याचे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.