कोल्हापूर : प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाबाबत दाखल असलेल्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. जर सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूकांबाबत काही निर्देश आले, तर राज्य सरकारला त्यावर तात्काळ अंमलबजावणी करावी लागेल असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता निवडणूकीच्या तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या कोल्हापूर येथे झालेल्या संकल्प सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांबाबत संकेत दिले आहेत. सोमवारी ओबीसी आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीचा निर्णय काय येतो हे सोमवारीच कळेल. मात्र न्यायालयाने निवडणुकांबाबत काही निर्देश दिले तर कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
गुढीपाडव्यानंतर राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अनावश्यक मुद्यांवर वाद निर्माण केला जात आहे. याला बळी न पडता एकोपा राखण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. नाहक मुद्दे उपस्थित करुन जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटणार आहेत का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.