मुंबई : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आज दोन्ही पक्षातील वाद शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळालं. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या.
‘सरकार पाडण्यासाठी भाजपने मला मदत मागितली. मदत न केल्यास तिहार जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या, असा गंभीर गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे. सरकार पाडण्यासाठी मला तीनवेळा भाजपाचे लोक भेटले. सरकार पाडण्यासाठी त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. जर सरकार पाडण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. अन्यथा केंद्रीय तपास यंत्रणा तुमचे वाईट करतील असे धमकावण्यात आल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
हे सरकार पडणार नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेकडून माझ्या नातेवाईकांच्या घरावर छापे टाकण्यात आले. तिहार जेलमध्ये टाकू, अशा धमक्या देण्यात आल्या. एकतर गुडघे टेकवा, अन्यथा सरकार घालवू, अशा धमक्या दिल्या जात असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील सरकार यांना पाडायचे आहे. हे सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे. मात्र आम्ही झुकणार नाहीत. महाराष्ट्र हा गांडूची अवलाद नाही. महाराष्ट्रातील माणूस बेईमान नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.