सांगली : प्रतिनिधी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिलीय. कोरोना हा रोग नसून तो एक मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्यालायकच नाहीत असं विधान भिडे यांनी केलं आहे.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या निर्बंधांच्या विरोधात सांगलीतील व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला संभाजी भिडे यांनी समर्थन दिले. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी राज्य आणि केंद्र सरकारलाही लक्ष्य केले. समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र शासन हे दु:शासन होता कामा नये, निवळ मूर्खपणा सुरू आहे. शासनाचे घातकी निर्णय आहेत. संसार आणि व्यापारी मातीमोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनर्त्याना कवडीमोल अक्कल नसल्याचेही संभाजी भिडे यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये खासदार-आमदार यांचे पगार सुरू आहेत. त्यांचे पगार परत घेऊन सरकारी खजिन्यात जमा करावेत. सामान्य माणसांची उपासमार सुरू आहे. लोकांनी बंड करून उठलं पाहिजे.दारू दुकाने उघडी आणि भाजी विकणाऱ्यांना पोलीस काठया मारतात. सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते संपूर्ण देशात आहेत. असलं सरकार फेकून दिलं पाहिजे असंही संभाजी भिडे म्हणाले.