Site icon Aapli Baramati News

SAD DEMISE : ज्येष्ठ लेखक, पत्रकार, वक्ते शिरीष कणेकर यांचं निधन; साहित्य, पत्रकारिता आणि मनोरंजन क्षेत्रावर शोककळा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी    

प्रसिद्ध लेखक, वक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांचं आज निधन झालं. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आज सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर साहित्य, पत्रकारिता आणि मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून विधी शाखेतील पदवी संपादित केली होती. तर पत्रकार म्हणून अनेक नामवंत दैनिकांमध्येही त्यांनी काम केले. तसेच विविध मराठी दैनिकांमध्ये त्यांचं स्तंभलेखन प्रसिद्ध होतं. त्यांच्या ‘लगाव बत्ती’ या कथासंग्रहाला साहित्य परिषदेने पुरस्कार देवून गौरवले होते.  तसेच विविध संस्थांच्या वतीनेही त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

शिरीष कणेकर हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार होते. क्रीडा आणि सिने-पत्रकारितेवर त्यांनी विशेष लेखन केलं. क्रिकेट, मनोरंजन विश्व आणि राजकारण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांच्या निधनानंतर साहित्य, पत्रकारिता आणि मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, विविध मान्यवरांनी कणेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिरिष कणेकर यांना श्रद्धांजली

“कोट्यवधी भारतीयांचं वेड असलेल्या क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष ही शिरीष कणेकर यांची ओळख होती. क्रिकेट, सिनेमासह अनेक क्षेत्रातील रंजक गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे होता. या रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांच्याकडे होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी क्रिकेट, सिनेमावेड्या मराठी माणसांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक, व्यासंगी पत्रकार, मनस्वी कलावंत, दिलखुलास व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांच्या अजरामर साहित्यकृती तसंच कथाकथनाच्या कार्यक्रमांमुळे ते कायम आपल्यासोबत राहतील. शिरीष कणेकर यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिरिष कणेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version