
मुंबई : प्रतिनिधी
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून तो रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस घरी उपचार घेतल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला होता. आज त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर त्याने घरीच विलगीकरणात राहणार असल्याची माहिती दिली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्याबद्दल ट्विट करत त्याने माहिती दिली होती. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असे त्याने या ट्विटमध्ये नमूद केले होते.
कोरोनाची लागण झाल्यानंतर सचिन घरीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत होता. मात्र पुन्हा दि. २ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आज त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने ट्विट करत चाहत्यांचे आभार मानत काही दिवस घरी विलगीकरणात राहणार असल्याची माहिती दिली आहे.