Site icon Aapli Baramati News

दिलासादायक : राज्यात दिवसभरात ५९ हजार ५०० रुग्णांचा डिस्चार्ज, तर ४८ हजार ६२१ नवे रुग्ण

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. तर लॉकडाऊनही १५ मेपर्यंत वाढवला आहे. शासन राबवत असलेल्या उपाययोजनांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. आज राज्यात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात आज दिवसभरात ५९ हजार ५०० कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात आज ५६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४० लाख ४१ हजार १५८ इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४७ लाख ७१ हजार २२ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या ३९ लाख ८ हजार ४९१ जण होम क्वारंटाईन आहेत. तर २८ हजार ५९३ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्यस्थितीत ६ लाख ५६ हजार ८७० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर गेल्या १५ दिवसांत ही रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात नागरिक, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, ठाणे, वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version