पुणे : प्रतिनिधी
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर २ एप्रिलनंतर मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य केले तर कोरोना आटोक्यात आणता येईल असेही ना. पवार यांनी नमूद केले.
पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पुण्यातील लॉकडाऊन बाबत भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यात सध्या तरी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. पण कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुण्यात रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. या नियमांचे पालन केले नाही तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल.
हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच एपीएमसीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार आहे. त्याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील. नागरिकांना धान्य किराणा भरून ठेवण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे, असे अजित पवारांनी सांगितले.
पुण्यातील शाळा-कॉलेज हे 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याआधी 31 मार्चपर्यंत शाळा कॉलेज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पुण्यातील उद्यान केवळ सकाळी उघडी राहणार आहेत. त्याशिवाय मॉल आणि थिएटर 50 टक्के संख्येने सुरु राहणार आहे.
पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवणार आहे. तसेच पिंपरीचे जम्बो हॉस्पिटल 1 एप्रिलपासून सुरु करणार आहोत. पुण्यातील ससून रुग्णालयातील 500 बेड्सची व्यवस्था करणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.