पुणे : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेस पक्षातर्फे अलका टॉकीज चौक आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशनजवळ आंबेडकर पुतळ्यासमोर ‘मोदीजी गो बॅक’ असा नारा देत आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकार आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. त्याचबरोबर राज्यपाल आणि अनेक नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला. मोदी यांनी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा दौरा केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केला आहे. त्याचा निषेध म्हणून आज दोन्ही पक्षांनी पुण्यात आंदोलन केले.
मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरात मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. ज्या मार्गावरून ते प्रवास करणार होते ते मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. मेट्रोचे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील एक-तृतीयांश काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यास वेळ असला तरी हा प्रकल्प पुणेकरांसाठी दिलासादायक आहे.