
कणकवली : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्यांनी आज अर्ज मागे घेतला असून त्यांनी सिंधुदूर्ग तपास अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करली आहे. त्यानंतर ते कणकवली दिवाणी न्यायालयात हजर झाले आहेत.
न्यायालयाने शरण गेल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. न्यायालयाला शरण जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वतःहुन शरण जात आहे. राज्य सरकारकडून मला आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सिंधुदुर्ग न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यामुळे राणे यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना कदाचित आजही जामीन मिळू शकतो. मात्र या प्रकरणाची अजूनही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील प्रदीप घरत न्यायालयात असून त्यांच्याकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.