मुंबई : प्रतिनिधी
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाली आहे. तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपकडून पत्रकाद्वारे या दोघांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील हे राज्यात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांना ही संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. या निमित्ताने भाजपने ओबीसी चेहऱ्याला महत्वाच्या पदावर संधी दिली आहे.
दुसरीकडे आशिष शेलार यांची दुसऱ्यांदा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे शेलार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बावनकुळे यांना देऊन भाजपने ओबीसी मते आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मुंबई महानगरपालिकेचा गाढा अभ्यास असलेल्या आशिष शेलार यांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याची संधी साधण्यात आली आहे.