मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारेच जेलमध्ये गेले असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करत ईडीने रविवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना अटक केली. गेल्या अडीच वर्षात राऊत यांनी सातत्याने भाजपावर टीकेची झोड उठवली होती. नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील भाजपा नेत्यांचा राऊत ‘सामना’च्या संपादकीयमधून समाचार घेत होते.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. ‘अनेकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारे संजय राऊत आज स्वत:च जेलमध्ये आहेत. सत्यमेव जयते असे सोमय्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
दुसरीकडे भाजपाचे मुंबईतील नेते मोहित कंबोज यांनी देखील ट्विट केलं आहे. त्यांनी जेवणाच्या डब्याचा फोटो ट्विट करत राऊत यांना चिमटा काढलाय. राऊत यांच्यावरील कारवाईचं समर्थन करताना कंबोज म्हणाले, संजय राऊतांना अटक झालीये. नवाब मलिक, संजय पांडे आणि आता संजय राऊत. पुढचा नंबर कोणाचा?
रविवारी सकाळी ईडीचे पथक संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर राऊत यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. दिवसभर राज्याच्या राजकारणात राऊत यांच्यावरील कारवाईचे पडसाद उमटत होते. भाजपाच्या नेत्यांनी कारवाईचे समर्थन केले होते.