पिंपरी : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे घ्यायचे असे काही ठरले नव्हते. पवारसाहेबांनी उद्धव ठाकरे हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील असं सांगितलं. आम्ही ते मान्य केलं, त्यानुसार आम्ही सर्वजण एकदिलाने काम करतोय, असे स्पष्टीकरण देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चांना विराम दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदावर स्पष्टीकरण दिले. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकार स्थापनेवेळीही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा रंगल्या होत्या. आताही त्याच चर्चा होताना दिसतात. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हे पाच वर्षे राहणार आहेत. अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर या दोघांमध्ये प्राथमिक चर्चा होईल असे सांगतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बिनविरोध निवडणुकीची गेल्या २४ वर्षांची परंपरा यामुळे खंडित झाल्याची खंत व्यक्त करत महाविकास आघाडीकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले मात्र ते यशस्वी होवू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानाबाबत न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाकडून याबाबत निर्णय येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.