
मुंबई : प्रतिनिधी
राज्यपाल हे संविधानिक आणि महत्वाचं पद आहे. या पदावर असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य करून हिंदूंमध्ये फुट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच त्यांनी ज्या महाराष्ट्राचं मीठ खाल्लं त्या मीठाशी ‘नमकहरामी’ केली असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. कोश्यारी यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
राज्यपाल कोश्यारी यांनी काल गुजराथी आणि मारवाडी लोक जर गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कोश्यारी यांच्यावर कडाडून टीका केली. यापूर्वी कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं. त्यानंतर आता त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल हे राज्यातील महत्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाचा अवमान करायचा नाही. मात्र या पदावर बसलेले भगतसिंह कोश्यारी हे ठरवून विविध विषयांवर वादग्रस्त वक्तव्ये करून या पदाची गरीमा घालवत आहेत. त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट नेमकी येते कुठून असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यपालांनी तातडीने या प्रकरणी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.