
पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मागे आम्ही फरपटत जाणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष पुर्ण तयारीनिशी या निवडणुकीत प्रचाराला उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी नाना पटोले म्हणाले, ‘शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही. या निवडणुकीत कोण मजबूत आणि कोण दुबळा याचा निर्णय जनताच घेईल. काँग्रेसच्या विचारधारेची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे असून त्याच ताकदीने आम्ही जनतेपुढे जाणार आहे. या दोन्ही नगरपालिकांना भ्रष्टाचाराने विळखा घातला आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षांनी लाच घेतली हे त्याचे ताजे उदाहरण आपल्या समोर आहे. या निवडणुकीत आम्हाला कोणी प्रस्ताव दिल्यास त्यावर आम्ही विचार करून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे या निवडणुकीत पक्ष एकत्र येणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.