नवी दिल्ली : प्रतिनिधी
खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संजय राऊत यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यास मदत करा अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल,असा इशारा सरकारी यंत्रणेतील काही व्यक्तींनी दिला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी या पत्रात केला आहे.
संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, सरकारी यंत्रणेतील काही व्यक्ती एक महिन्यापूर्वी मला भेटले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यास मदत करा. अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल. रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासारखे तुम्हालाही तुरुंगात जावे लागेल. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारमधील दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन मोठ्या नेत्यांना अटक होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला असल्याचं राऊत यांनी पत्रात नमूद केलं आहे.
राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत असं भाकीत त्या सरकारी व्यक्तींनी केले आहे. ईडीसारख्या संस्थांचा राजकीय वापर होत आहे, असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यासोबतच संजय राऊत यांनी संबंधित पत्र काँग्रेस नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा यासह अन्य मुख्य पक्षांच्या नेत्यांना पाठवले आहे.