Site icon Aapli Baramati News

व्यक्तीविशेष : सुख-दु:खात स्थितप्रज्ञ राहणारे योगी : बाबामहाराज सातारकर

ह्याचा प्रसार करा

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याबद्दल अनेक आठवणी आहेत. त्यापैकीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी त्यांच्या आठवणी लेख स्वरूपात लिहिल्या आहेत. अगदी बालपणापासून त्यांच्यासोबत घालवलेले क्षणही त्यांनी यात ,लिहिले आहेत. आपली बारामती न्यूजच्या वाचकांसाठी हा लेख जसाच्या तसा..    

माझं बालपण सोलापूरच्या कामगार नगरीत गेलं. माझी आजी राहीबाई ही वारकरी होती. तिला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ. पाच दहा महत्वाचे अभंग आणि हरिपाठ एवढं तीच पांठातर होत. बाकी सतत पांडुरंगाचे नामस्मरण आणि भजन अस सतत सुरु होत. मला लहानपणी आजीच्या माध्यमातून संतांची चरित्र आणि चमत्कार ऐकायला मिळत होते. याच वातावरणात माझी जडणघडणं होत होती.

आमची कामगार वस्ती. गिरणीकामगारांची बिऱ्हाड इथं राहायची. सगळी लोक गरीब, पण त्या गरिबीत सुद्धा एकमेकांना जिवाला जीव द्यायची. पैसा कमी पण मनाची श्रीमंती खूप. आमच्याकडे भगवान सखाराम चव्हाण नावाचे एक पुढारी होते. कामगारांचे पुढारी. काँग्रेस विचाराचे पाईक. ते आमच्या कामगार नगरीत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतं.

साल नक्की आठवत नाही . आम्ही चौथी पाचवीत शिकत होतो.याच वर्षी हरीनाम सप्ताह पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावर्षी त्यांनी एका तरुण किर्तनकाराला निमंत्रीत केले होते.शर्ट पॅन्ट हा त्यांचा वेश होता. किर्तनात मात्र पारंपरिक वेश असे.आम्ही शाळकरी मुलं पहिल्या दिवशी किर्तन ऐकायला गेलो. त्यांचे ते व्यक्तिमत्व, तो आवाज, अंतःकरणाला भिडणारी भाषा, आणि संवाद कौशल्य, हा तरुण कीर्तनकार आम्हाला भावला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा हा अभंग घेऊन त्यांनी केलेले निरूपण त्याही वयात आम्हाला समोहित करून गेले. आम्ही पूर्वीही किर्तन ऐकली होती पण ती किर्तन आणि हे किर्तनकार यात एक फरक होता की किर्तन दुरून ऐकलं ते रेकॉर्डवर सुरु आहे अस वाटतं अस टायमिंग आणि शैली होती..

बाबामहाराज सातारकर यांची झालेली पहिली भेट अशी.. आम्ही तेव्हा अगदी शाळा चुकवूनही पोटभरून त्यांची किर्तन ऐकली. मी स्वतः खूप प्रभावित झालो. नंतर काही दिवसांनी सोलापूरला दूरदर्शन आले. हळूहळू आमच्या घरातही टीव्ही आला. आणि योगायोग असा की टीव्हीवर बाबा महाराज त्यांच्या निरूपणाचे कार्यक्रम सुरु झालेले.आई, मी आणि आजी तिघेही हा कार्यक्रम आवर्जून ऐकू लागलो. घरबसल्या आम्हाला बाबा महाराज यांच्या निरूपणाचा लाभ होऊ लागला.या निरूपणामुळे मी समृद्ध झालो. ऐकण्यासाठी कान तयार झाला..

पुढे शिक्षण घेऊन मुंबईला नोकरीला गेलो. यादरम्यान बाबा महाराज यांच्या कीर्तनच्या कॅसेट आलेल्या. त्या ऐकत होतो. कोठे योग आला तर किर्तन सुद्धा ऐकत होतो. गिरगांव जावजीबुवाची वाडी हा त्यांचा पत्ता माझ्या लक्षात होता.. एकदरीत बाबांनी आमच मनोविश्व व्यापलं होत.

सन 1996 साली मी मुंबईत पद्मसिंह पाटील साहेब यांच्याकडे नोकरीला होतो.एक दिवस आमच्या कामाच्या निमित्त दैनिक नवाकाळ ऑफिसला संपादक नीलकंठ खाडिलकर यांना भेटायला गिरगावला गेलो होतो. तिथं जावजीबुवाची वाडी हा पत्ता वाचला आणि बाबांची आठवण झाली. पत्ता विचारत गेलो. बाबा महाराज भेटले. त्यांना मी माझ्या आठवणी सांगितल्या. ते निवांतपणे माझ्याशी बोलले. मला खूप आनंद झाला. त्यांच्या बहीणीने आम्हाला चहा दिली. बाबासोबत झालेली ती भेट मला आनंद देऊन गेली..

पुढे बाबा यांच्या अनेक गोष्टी ख्याली खुशाली कळत गेल्या. स्वतःहून संपर्क व्हायचा. ते मला हक्काने काही गोष्टी सांगत असतं. माझे आणि त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले.एकदा त्यांनी मला त्यांच्या घरीही बोलावून घेतले होते. त्यांच्यासोबतचे ऋणानुबंध मला आनंद द्यायचे अभिमान वाटतं असे..

महाराष्ट्रात एक लोकप्रिय किर्तनपरंपरा बाबा महाराज साताराकर यांनी निर्माण केली. लहान थोर गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष अबालवृद्ध त्यांचे चाहते होते. देशात आणि परदेशात जाऊन त्यांनी किर्तन केली. सामान्य भाषेत त्यांनी लोकांना अध्यात्मासारखा अवघड विषय समजावून सांगितला. हरिपाठ आणि पसायदान या दोन्हीही श्रेष्ठ अजरामर काव्याचे निरूपण करावे ते बाबांनीच. सोप्या भाषेत त्यांनी अवघड गोष्टी सांगितल्या. हे शिकले होते त्यांना समजले पण अडाणी आणि निरंक्षर माणसाला सुद्धा बाबांनी भक्तीची वाट समजावून दिली..

बाबांच्या आयुष्यात अनेक सुखाचे प्रसंग आले तसे दुःखाचेही आले. सुख पहाता जवाएवढे दुःख पर्वताएवढे अस त्यांचे आयुष्य होते पण सुखात आणि दुःखात स्थितप्रज्ञ राहणारा हा योगी होता. गृहस्थाश्रमी राहून साधूसारखे आयुष्य जगलेला हा मोठा माणूस आपल्यातून निघून गेला. आपली मोठी हानी झालीय.महाराष्ट्राचे थोर सुपुत्र बाबा महाराज यांना विनम्र अभिवादन..!

विशेष कार्य अधिकारी

ना. अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version