पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलने वर्चस्व राखले आहे. सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला असून एका जागेवर मात्र राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांचा पराभव करत भाजपचे प्रदीप कंद हे निवडून आले आहेत. यापूर्वी जिल्हा बँकेच्या १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरीत सात जागांसाठी रविवारी दि. २ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आज पुण्यातील अल्पबचत भवनामध्ये मतमोजणी पार पडली. त्यामध्ये सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलला विजय मिळाला आहे. तर भाजपचे प्रदीप कंद यांना अनपेक्षित यश मिळाले आहे.
आज झालेल्या निकालामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार, सुनील चांदेरे, दिगंबर दुर्गाडे, विकास दांगट, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील यांचा विजय झाला आहे. तर ‘क’ वर्गातून प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांचा अवघ्या १४ मतांनी पराभव केला आहे. एकूणच राष्ट्रवादीने या निवडणुकीत एकहाती सत्ता राखली असली तर एका जागेवर भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे या भाजप उमेदवाराला नेमकी कोणाची मदत मिळाली यावरच आता चर्चा रंगू लागल्या आहेत.