मुंबई : प्रतिनिधी
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद अजूनही संपलेला नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरात लवकर घालवले पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील असा आरोप केला.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल चढवला. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नसंदर्भात बैठक पार पडली. तरीदेखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा पहिली तर हे महाराष्ट्राचे पाच तुकडे करायला निघाले असल्याचे दिसते. कर्नाटकातही भाजपाचे सरकार आहे आणि महाराष्ट्रातही भाजपाचे मिंदे सरकार आहे. दोघांच्या संगनमताने केंद्र सरकारला महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत. मुंबई तोडायची आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्राच्या सीमेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील गावांवर दावा केला जातोय. अशा परिस्थितीतही राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० आमदार गुवाहाटीच्या दौऱ्यावर निघाले आहेत. उद्या आसामचे हे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा करतील. त्यामुळे राज्यातील हे सरकार लवकरात लवकर घालवलं पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राचे पाच तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.