Site icon Aapli Baramati News

आता शिवभोजन थाळी मिळणार पार्सल..! छगन भुजबळ यांची घोषणा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश आज दिले आहेत. 

महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी योजना सुरू करत सर्वसामान्य जनतेला मोठा आधार दिला आहे. कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला अत्यल्प किमतीत शिवभोजन थाळी उपलब्ध झाली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी असे आवाहन करून छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबर भुजबळ म्हणाले की पूर्वीप्रमाणेच 5 रुपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी सरकारने “ब्रेक दि चेन” या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनीच राज्य सरकारला सहकार्य करावे,  असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version