
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला नसून जवळपास ४० हजार एसटी कर्मचारी कामावर परतले नाहीत. राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या आजच्या बैठकीमध्ये राज्य सरकारने एसटी कामगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी उद्याच कामावर रुजू व्हा, अन्यथा ११ हजार नव्या कामगारांच्या भरतीची निविदा तयार आहे, असा शेवटचा इशाराच परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांनी उद्याच कामावर रुजू व्हा. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नवीन ११ हजार चालक आणि वाहक यांच्या भरतीही निविदा तयार आहे. आता जर कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही. तर लवकरच ही निविदा प्रक्रिया जारी करण्यात येणार आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.
प्रशासनाकडून आतापर्यंत एकूण सातवेळा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा प्रशासन केवळ कारवाईचा इशारा देत आहे, असा समज झाला आहे. आता मात्र आमची कारवाई सुरू करणार आहोत. त्यांना नोकरीची गरज नसल्याचे आमचे मत झाले आहे. कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे थांबवले होते. मात्र उद्यापासून कारवाई होईल, असा स्पष्ट इशाराच अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.