Site icon Aapli Baramati News

नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच; आणखी दोन आठवडे वाढला तुरुंगातील मुक्काम

ह्याचा प्रसार करा

मुंबई: प्रतिनिधी

ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाकडून आजही दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांची आज न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यांना न्यायालयात हजर असता, पीएमएलए विशेष न्यायालयाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आणखी दोन आठवडे नवाब मलिक यांना तुरुंगातच काढावे लागणार आहेत.

मागील झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने नवाब मलिक यांच्या तीन मागण्या पूर्ण केल्या होत्या. नवाब मलिक यांच्या मागणीनुसार त्यांना कोठडीत बेड, गादी आणि खुर्ची उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या अगोदरही न्यायालयाने त्यांच्या चौकशी दरम्यान आपल्या वकिलांना उपस्थित राहू देणे, घरचे जेवण मिळावे आणि दररोजचे औषधे घेऊ द्यावेत, या मागण्या मान्य करत आदेश दिले होते.

दरम्यान, नवाब मलिक यांनी ईडीकडून होत असलेली कारवाई चुकीचे असल्याचे सांगत उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेकडून होत असलेली कारवाई चुकीची नसल्याचे सांगत नवाब मलिक यांची याचिका फेटाळली. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देत नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या याचिकेवर सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय याचिकेवर काय निर्णय घेते ,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version