मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणेंना आपण फारसे महत्व देत नाही. अशा पद्धतीने बोलणे हा कदाचित त्यांच्या संस्काराचा भाग असावा अशा शब्दात त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी नारायण राणे यांना आज अटक करण्यात आली. या अटकेनंतर आता विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या प्रकरणावर खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी जाताना माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर बोलताना “मी राणेंना महत्त्व देत नाही. त्यावर काय बोलायचं? ते त्यांच्या पद्धतीने चालत आहेत, कदाचित त्यांच्या संस्कारचा तो भाग असावा,” अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.