
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा दौरा केला. शनिवारी (दि.३० जुलै) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एका आजीबाईंनी जिवंत व्यक्तीला मयत दाखवून ‘पीएम सन्मान योजने’चा लाभ बंद करण्यात आल्याची कैफियत त्यांच्यासमोर मांडली. विरोधी पक्षनेते अजितदादांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांना न्याय देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. अजितदादांची जागेवरच काम करण्याची शैली ठाऊक असल्याने प्रशासनानेही त्या आजीबाईंसोबत अन्य लाभार्थ्यांना या योजनेतून बंद झालेला लाभ पुन्हा सुरु केला.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे राज्यातील शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राज्याच्या दौऱ्यावर होते.
शनिवारी ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेतीची पहाणी करताना जिवंत व्यक्तीला मयत दाखवून ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याची तक्रार एका आजीबाईंनी अजितदादांच्याकडे केली. जिवंत व्यक्तीला मयत दाखवून लाभ बंद केल्याचे निदर्शनास आल्याने अजितदादांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. तातडीने या प्रकरणाची चौकशीकरुन संबंधितांना न्याय देण्याच्या सूचना केल्या.
त्याचबरोबर अशा प्रकारची आणखी काही प्रकरणे असल्यास ती तपासून संबंधीत लाभार्थ्यांना न्याय देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. अजितदादांच्या कामाची शैली माहित असल्याने प्रशासनाची सूत्रे हालली आणि दप्तर दिरंगाईत अडकलेल्या प्रकरणाला गती मिळाली. ‘पीएम किसान योजने’तील चुकून अपात्र ठरलेले लाभार्थी पुन्हा पात्र ठरले असून त्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळू लागला आहे.