मुंबई : प्रतिनिधी
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर आहे असे म्हणता येणार नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी मलिक हे रितसर जामिनासाठी अर्ज करू शकतात असेही न्यायालयाने म्हटले आहे.
ईडीने अंडरवर्ल्ड संबंध असल्याच्या आरोपातून नवाब मलिक यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये ईडीने केलेली अटक बेकायदेशीर म्हणता येणार नाही असे उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र नवाब मलिक हे रितसर जामीन अर्ज करू शकतात असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची बहीण हसिना पारकर हिच्याकडून बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. त्यावरुन त्यांना ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आज न्यायालयाने ईडीच्या कारवाईवरील याचिका फेटाळल्यानंतर आता नवाब मलिक यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.