मुंबई : प्रतिनिधी
२ जानेवारी रोजी मुंबई बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने मजूर प्रवर्गात मोडता अशी विचारणा सहकार विभागाकडून नोटीशीदवारे करण्यात आली आहे. त्यामुळे दरेकरांच्या अडचणीत वाढ झाली असून ते आता काय उत्तर देतात याकडेच लक्ष लागले आहे.
मुंबई बँकेची निवडणूक २ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या निवडणुकीसाठी मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जावर सहकार सुधार पॅनेलचे संभाजी भोसले आणि अंकुश जाधव यांनी आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
या अर्जावरून सहकार विभागाने दरेकर यांना नोटीस पाठवत तुम्ही कोणत्या पद्धतीने मंजूर प्रवर्गात मोडता असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रवर्गात अर्ज करणारा उमेदवार हा अंग मेहनत करून उदरनिर्वाह करणारा असावा असा नियम आहे. मात्र प्रवीण दरेकर हे गेल्या निवडणुकीतही याच प्रवर्गातून निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर सहकार विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. यावर आता प्रवीण दरेकर काय उत्तर देतात आणि ते मजूर असल्याचे सिद्ध करतात का याकडेच लक्ष लागून राहिले आहे.