
पुणे : प्रतिनिधी
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना इतर आजारांनी ग्रासले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असतानाच आज त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
४६ वर्षीय राजीव सातव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मध्ये हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
राजीव सातव हे कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपासून आजारी होते. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालवली होती. न्यूमोनियासोबतच त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो cytomegalovirus हा नवा व्हायरस सापडला होता. मागील 23 दिवसांपासून राजीव सातव आजाराशी लढत होते. पण रविवारी त्यांची झुंज संपली.
विविध मान्यवरांची श्रद्धांजली..
राजीव सातव यांच्या निधनाच्या वृत्ताने राजकीय क्षेत्राला जबर धक्का बसला. विविध मान्यवरांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले.