Site icon Aapli Baramati News

विद्यार्थ्यांवर काळाची झडप; शेततळ्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

ह्याचा प्रसार करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे शेततळ्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी (दि. ३०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी तिघांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले तिघेही दहावीची परीक्षा देत होते.

अक्रमखान अयुबखान,उमेरखान नासेरखान आणि अनास हफीज शेख ( तिघेही रा. अजिंठा) अशी मृत मुलांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, दहावीचा पेपर देऊन हे पाच मित्र शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. त्यावेळी उमेर खान, शेख अनाज, आक्रमखान या तिघांनी सोबतच पाण्यात उडी घेतली. मात्र तिघांनाही पोहता येत नसल्यामुळे  गंटकळ्या खात शेततळ्याच्या तळाशी गेले. त्यांच्या सोबत पोहण्यासाठी आलेल्या त्यांच्या इतर दोन मित्रांनी त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

दोन्ही मित्रांनी तात्काळ गावात जाऊन या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. गावातील ग्रामस्थांनी तात्काळ शेतळ्याकडे धाव घेतली. तिघांनाही शेततळ्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी तत्काळ अजिंठा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक विजय मराठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून अजिंठा पोलीस ठाण्यात उशिरा आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version