जालना : प्रतिनिधी
कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्यामुळे एका अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. समाजात बदनामी होईल म्हणून वडील आणि चुलत्यानेच गळफास देऊन मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना जालन्यातील पिरपिंपळगाव येथे घडली आहे. दरम्यान, सावडण्याचा विधी सुरू असतानाच पोलिस दाखल झाल्याने ही घटना उघडकीस आली आहे.
सूर्यकला उर्फ सुरेखा संतोष सरोदे (17) असे मयत मुलीचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरेखा ही दि. ११ डिसेंबर रोजी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. या दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असतानाच संबंधित मुलगी गावात परतली. त्यावेळी तिचे वडील संतोष भाऊराव सरोदे आणि चुलता नामदेव भाऊराव सरोदे यांनी तिचे लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली.
पिरपिंपळगाव-आन्वी रस्त्यावरील देवीच्या मंदिरात या लग्नाची तयारी सुरू होती. अशातच तिच्या वडीलांनी मुलीच्या नावे अर्धा एकर शेतजमीन करून द्यावी अशी मागणी मुलाकडील नातेवाईकांकडे केली. ही मागणी न पटल्यामुळे संबंधित मुलाच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार देत निघून जाणे पसंत केले. याचवेळी मुलीचा चुलता नामदेव सरोदे याने आपली समाजात बदनामी झाल्याचे सांगत आत्महत्येची धमकी दिली.
मुलीच्या वडीलांनी तू कशाला आत्महत्या करतो असे म्हणत या मुलीला शेतातील झाडाजवळ नेत दोरीने गळफास देत तिचा खून केला. हा प्रकार कोणाला कळू नये यासाठी त्यांनी शेतातच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र बुधवारी सकाळी सावडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिचे कुटुंबीय अस्थि आणि राख टाकून देण्यासाठी नदीकडे जात असताना पोलिस दाखल झाले. त्यांनी वडील संतोष आणि चुलता नामदेव सरोदे या दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.