Site icon Aapli Baramati News

SAD DEMISE : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या होणार अंत्यसंस्कार

ह्याचा प्रसार करा

अहमदनगर : प्रतिनिधी

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दरम्यान, गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, ढाकणे यांच्या निधनाने एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त करत अनेक मान्यवरांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

बबनराव ढाकणे यांना न्यूमोनिया झाल्यामुळे अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांना गुरुवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्येच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे.  बबनराव ढाकणे यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पागोरी पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

१० नोव्हेंबर १९३७ रोजी जन्मलेल्या बबनराव ढाकणे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या वतीने निवडणूक लढवली होती. विद्यार्थी दशेपासूनच समाजकारणात सक्रिय असलेल्या बबनराव ढाकणे यांनी गोवा मुक्तीसंग्रामताही सहभाग घेतला होता. चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात ऊर्जा संसाधनमंत्री म्हणून त्यांनी काम केले. बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या बबनराव ढाकणे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा सभागृहात काम केले.

संघर्षशील आणि आक्रमक नेता म्हणून बबनराव ढाकणे यांची ओळख होती. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ग्रामविकास मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे पुत्र प्रतापराव ढाकणे यांनी माहिती दिली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version