लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील किल्लारी पोलीस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायफलमधून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पैशाच्या तणावातून पोलीस कर्मचारीने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
साहेबराव सावंत असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते किल्लारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्याकडून २०१७ ते २०१८ या कालावधीत काही जणांनी पैसे घेतले होते. घेतलेले पैसे पुन्हा मिळाले नाहीत. त्यातूनच साहेबराव सावंत यांनी रायफलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.
आत्महत्या करण्यापूर्वी साहेबराव सावंत यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची माहिती आहे. त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये काही व्यक्तींची नावे लिहिलेली आहेत. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.