औरंगाबाद : प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह मुलांना वडापावमधून विष दिल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात घडला आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पतीवर औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली असून संबंधित पतीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. या वादातून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. त्यातूनच आरोपी इसाक शेख याने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने १६ ऑगस्टच्या रात्री वडापावमध्ये विष कालवून पत्नीसह मुलांना खाण्यासाठी दिले होते.
मात्र उग्र वास येत असल्याने तक्रार महिलेने वडापाव न खाता ते फेकून दिले. त्या वडापावमध्ये काहीतरी मिसळल्याचं लक्षात आल्यानंतर तिने क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेत पती इसाक शेख याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पती शेख इसाक, नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस, शेख याकूब, फुरखान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. पत्नी आणि मुलांच्या जीवावर उठलेल्या पतीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. कौटुंबिक कारणातून थेट हे पाऊल उचलल्यामुळे संबंधित पतीवर कठोर कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.