बीड : प्रतिनिधी
संपत्तीच्या वादातून आज बीड जिल्ह्यातील केज येथे नायब तहसीलदार महिलेवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. सख्ख्या भावानेच हा हल्ला केल्यामुळे बीड जिल्हा हादरला असून एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदार आशा वाघ या केज येथील तहसील कार्यालयात आपले काम करत होत्या. त्यावेळी अचानक त्यांचा सख्खा भाऊ कार्यालयात येवून गोंधळ घालू लागला. या गोंधळातच त्याने स्वतःजवळील कोयत्याने आशा वाघ यांच्यावर हल्ला केला.
हा गोंधळ पाहून तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या हल्लेखोराला एका खोलीत डांबून ठेवत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या माथेफिरू भावाला अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून त्याने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात आशा वाघ या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. संपत्तीच्या हव्यासात सख्खा भाऊच बहिणीच्या जीवावर उठल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.